सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सत्तेचे वारकरी--- दर्जेदार लेख नक्की वाचा !!!

सत्तेचे वारकरी

   सत्तेच्या पालखीचा वृत्तान्त- दि.१९ जून सर्व वारकरी ठाणे येथील महापौर बंगल्यामध्ये जमा झाले. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला‌.'धर्मवीर' महाराजांनी या सोहळ्याचे नियम समजून सांगितले. मधून कुणालाही परत येता येणार नाही, हेही सांगितले. तेथून उत्साहात सोहळा सुरू झाला. पालखीचा पहिलाच मुक्काम सुरत येथे झाला. स्वागतासाठी कंबोज आणि कुटे यांनी कंबर कसली. सर्व वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची आणि मनोरंजनाची व्यवस्था केली होती.
    सुरत येथे पहिले रिंगण सुरू असतानाच, उस्मानाबाद येथील एक वारकरी घराच्या आठवणीने व्याकुळ झाला. लघुशंकेचे निमित्त करून तेथून सटकला. मिळेल त्या वाहनाने घरी परतला. हे समजताच वारकऱ्यांमध्ये ठराव झाला. आता कुणालाच परतू द्यायचे नाही.
    एवढ्यात अकोला येथील दुसरा वारकरी मी घरी जाणारच म्हणून हट्ट करू लागला. त्याला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन झोपेचे इंजेक्शन देऊन झोपवला. घरून फोन आल्यावर हार्ट अटॅक आल्याचा निरोप दिला.
     दुसऱ्या दिवशी आसाम येथील गुवाहाटी येथे जाण्यास पालखी सोहळा निघाला. सकाळी सकाळी सुरुवातीलाच 'धर्मवीर' महाराजांचे 'धर्म आणि अवहेलना' या विषयावर किर्तन  आणि प्रवचन झाले. ते ऐकून सर्व मंडळी आसामला डेरेदाखल झाली.
     अकोल्याचा वारकरी शेवटी तेथून घर गाठण्यासाठी पळालाच. 'धर्मवीर' महाराज काहीसे खिन्न झाले. एवढ्यात वारी चुकलेले काही वारकरी मिळेल त्या वाहनाने येऊन अधूनमधून सोहळ्यात सामील होत होते. घरची ख्याली खुशाली सांगत होते आणि आम्हीही या पालखी सोहळ्याचाच भाग आहे हे दाखवत होते.
    सर्वांच्या चेहर्‍यावर विलक्षण चैतन्य आणि तेज दिसून येत होतं. जणूकाही घरातील कर्त्या वडीलधारी व्यक्तीनेच यांना हौसेने पालखी सोहळ्यात पाठवले. असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.चैतन्यमयी वातावरणातच सर्वजण दिल्ली येथील भगवंत दर्शनाची कल्पना करत करत झोपी गेले. 
     सत्तार यांच्या हाती वीणा आणि भगवा ध्वज देऊन 'धर्मवीर' हिंदुत्वाचा जप करत होते. माजी.मुख्यमंत्री सातत्याने वारकऱ्यांची चौकशी करत होते. पालखी दिल्लीला पोहोचल्यावर दर्शनाला 'मी पुन्हा येईन' असे ते सांगत होते. 'या पालखी सोहळ्यामुळे तुमच्यावरील ईडीचे संकटही दूर होईल. आणि मुंबई मनपाचा प्रसादही मिळेल.. असा आशावाद ते देत आहेत.
     पालखी सोहळा आज बहुतेक गोव्याला पोहचू शकतो. कदाचित मार्गही बदलू शकतो. ठरल्याप्रमाणे सर्व प्रवास उत्साहात सुरू आहे. लवकरच भगवंत दर्शनाने सर्वजण कृतकृत्य होतील. आणि पुन्हा स्वगृहीच परत जातील. 
   कारण वडीलधारी मंडळी घरीच वाट पाहत असतील. 'मातोश्री' आपल्या काही भोळ्याभाबड्या लेकरांना पुन्हा मायेच्या पदराखाली घेतील.गद्दारांच्या पार्श्वभागी लाथ देतील.  यात शंकाच नाही....
"हम सब एक है,
महाशक्तीसे नेक है,
टीव्ही न्यूज मत देखो,
ओ सब फेक है..."
असा नामगजर सगळीकडे दुमदुमत आहे.....

        विपुल पाटील
(टीप-महाराष्ट्रामध्ये संत परंपरेतील पालखी सोहळा सुरू असतानाही, सर्व चॅनेल राजकारण्यांच्या मागे धावत आहेत. एकही चॅनेल खऱ्या सोहळ्याची दखल घेत नाही. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावे यासाठीच प्रस्तुत लेख लिहिला आहे)
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com