सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सरपंच असावा तर आप्पा सारखा !! मुक्काम पोस्ट मसूचीवाडी

सरपंच असावा तर आप्पा सारखा !!
मुक्काम पोस्ट मसूचीवाडी

सुपर फास्ट न्यूज नेटवर्क

तीन वर्षांपूर्वी मी दिव्य मराठी साठी दत्तू आप्पा खोत यांच्यावर लेख लिहिला होता.'सरपंच नावाचा देवमाणूस.'या मथळ्याचा तो लेख राज्यभर गेला होता. तो लेख वाचून अनेकांनी दत्तू आप्पांना भेटायची इच्छा व्यक्त केलेली.तर अनेकांनी असा माणूस खरोखरच  आहे की तुम्ही कथा लिहिली आहे अशीच विचारणा केलेली.

आज तीन वर्षांनंतर मी पुन्हा वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी गावाला निघालोय.आज सोबत आहेत अजय शिंदे.काँग्रेस पक्षात काम करणारा एक तरुण सहकारी.राजकारणाची आवड असलेला एक उमदा पोरगा.जवळच्या नात्यातीलच.सागरोबाची खिंड ओलांडली की एक वेगळच वार सुरू होत.घाटाखालचा भाग सुरू होतो.तुपारीवरून ताकारीत आलो.कृष्णा नदी आली. ही नदी आली अनेक कटू आठवणी जाग्या होतात.त्या कधीतरी सांगणार आहे सविस्तरपणे.
बोरगावच शिवार आलं.या गावाला एक इतिहास आहे. आत्माराम बापू पाटील यांचे हे गाव.नेतृत्वाची एक परंपरा या गावाला आहे.दक्षिण महाराष्ट्रातील महत्वाचं गाव.तिथूनच मसुचीवाडीला रोड आहे.याच गावात आपण या लेखाच्या चरित्रनायकाला भेटायला निघालोय.गावच्या विकासाच्या शिल्पकाराकडे निघालो आहे.अस म्हटलं तरी चालेल. कारण या गावाला रस्ता नव्हता.एक पाऊलवाट होती. झाड झुडपं होती. आप्पानी हातात कुऱ्हाड घेतली. आणि रस्ता करायला सुरुवात केली.हा रस्ता एका दिवसात झाला नाही.अनेक दिवस गेले. आप्पानी प्रसंगी स्वतःचे शेत दिले पण गावाला रस्ता केला. गावाला मुख्य रस्त्याशी जोडले.इथून त्यांच्या कामाची सुरुवात होते...
गावाला रस्ता झाला की मग गावाला एसटी आली पाहिजे म्हणून आप्पा प्रयत्न करू लागले पण एसटी कशी येईल?लोक म्हणू लागले.रस्ता  झालं एवढं रग्गड झालं.पण आप्पा कसे थांबतील?त्यांनी गावात एसटी आणली.ज्या दिवशी गावात एसटी आली त्यादिवशी गावातील लोकांना पटत नव्हते. गावात एसटी आलीय म्हणून .आणि आलेली गाडी गावात पुन्हा येईल अशी खात्री नव्हती.पण एसटी आप्पानी आणलेली.ती सुरू राहिली.अगदी आज गावात प्रत्येक घरात वाहन आलं तरीही.

गावाला पोस्ट नव्हतं.आप्पानी गावाला पोस्ट आणलं.पोस्ट वाढावं म्हणून आप्पानी घरोघरी मोफत पोस्टकार्ड वाटली आणि लोकांना आपापल्या पाहुण्यांना पत्र लिहायला लावली.मायना आप्पानी शिकवला. मग गावात प्रत्येकाच्या नावानं पत्र यायला लागली. पोस्ट गावात रुजलं.पोस्ट आल्याव काही काळाने गावात टेलिफोन ऑफिस आणलं.गावात फोनची रिंग वाजू लागली.
1969 साली आप्पानी गावचे सरपंच म्हणून हाती सूत्र घेतली.2000 सालापर्यंत. सलग 32 वर्ष सरपंच होण्याचा विक्रम त्यांनी केला.या काळात सरपंच म्हणून नाही तर गावचा पालक म्हणून त्यांनी काम केलं.गावाला रस्ता आणल्यापासून ते हायस्कुलपर्यंत त्यांनी गावाला सर्व काही आणलं.मसूचीवाडी या गावाची नवी ओळख सांगली जिल्ह्याला झाली. आणि अप्पांच्या नावानं गाव ओळखू लागलं.
गाव कुठलं?
मसुचीवाडी म्हणताच
आप्पांच गाव काय?असं लोक विचारायची.
त्यांचे चिरंजीव संजय कदम आणि गावातील काही लोक मध्यप्रदेशला गेलेले. एका गावात त्यांच्या गाडीचा घोटाळा झाला.मग ते मिस्त्रीचा शोध घेऊ लागले.काही वेळातच एकजण गृहस्थ आले.
त्यांनी गाडी सांगली जिल्ह्यातील आहे का?
अस मराठीत विचारलं. मराठी भाषा बोलणारा माणूस पाहून हे लोक आनंदी झाले. त्यांनी सांगलीतील कोणत्या गावातील गाडी आहे असं विचारताच मसूचीवाडी म्हणताच ते गृहस्थ म्हणाले,"दत्तू आप्पा माहिती असतील?"
"हो मी त्यांचा मुलगा आहे."अस संजय यांनी सांगितलं.
"मी त्यांना भेटलेलो नाही पण सांगलीला होतो तेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलं आहे. खूप चांगला माणूस आहे तो."अस म्हणत त्यांनी सगळ्याना घरी नेले, पाहुणचार केला आणि पुढच्या प्रवासाला मदत केली.असा आप्पांचा वट बघायला मिळाला.
आप्पा गावचे सरपंच होते पण ते गावातील प्रत्येक कुटुंबातील लोकांना आपले वाटायचे. सगळा प्रवास मोटरसायकलवरून.कोणत्याही भागात गेले आणि त्या भागात जर गावातील मुलगी असेल तर आप्पा त्या घरी जाणार.त्या मुलीला भेटणार.एखादा जावई जर खट्याळ असेल तर मुद्दाम जाणार,त्यामुळे पोरंगीच बळ वाढायच.आणि जावई सुद्धा वचकून रहायचा.गावतील प्रत्येक माहेरवासींनीच्या घरी आप्पा किमान एकदा तरी गेलेले आहेत. हा कसला सरपंच हा तर गावचा कुटुंबप्रमुख अस वाटत रहात आप्पांशी बोलताना.
32 वर्षे सरपंच राहिलेला हा माणूस. अलीकडे पाच वर्षाच सरपंचपद नऊ जणात वाटून घेतलं जातं.प्रत्येकाला वाटत आपलं नाव बोर्डावर आल पाहिजेल.अनेक ठिकाणी हाणामारी होतात पदावरून. अशा वेळी एखाद्या खेड्यात एक माणूस सलग 32 वर्षे हे पद भूषवतो.गावाला नवी ओळख देतो. कायापालट करतो.गावकऱ्यांसाठी पदरची भाकरी घेऊन घराच्या बाहेर पडतो.लोकांची काम करतो. अगदी गावातील कोणी आजारी पडले आणि वाहन नसेल तर आप्पानी त्या व्यक्तीला स्वतःच्या खांद्यावरन बोरगावपर्यत पाच किलोमीटर नेले आहे. आप्पांच्या सेवेची दखल घेत गावाने वर्गणी काढून त्यांना जीपगाडी घेऊन दिली.पण ती जीपही त्यांनी सार्वजनिक म्हणून वापरली. प्रत्येक माणसाला त्याचा लाभ झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं.लोकांनी वर्गणी काढून ज्याला जीप दिली हा एकमेव सरपंच असावा.दत्तू रत्तु खोत.
आम्ही आप्पाना भेटलो.घराच्या बाहेर कॉटवर बसलेले. जुन्या आठवणी सांगत होते.राजारामबापू पाटील,क्रांतिवीर नागनाथ अण्णा,आर आर आबा यांच्या आठवणी सांगितल्या.वयाची ऐंशी पार केलीय पण अजूनही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवडणूकीसाठी भाग घेतात.हा माणूस देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनाही माहिती आहे. त्यांचं नाव त्यांच्यापर्यंतही गेलं आहे. आता वय झालं आहे पण त्यांच्यातला कार्यकर्ता जागा आहे. आम्ही गेल्यावर आम्हाला लगेच विचारले,"काय काम आहे का?"
आपल्याकडे जो माणूस येतो तो काम घेऊन येतो आणि त्याला मदत करायची एवढं आप्पाला माहिती.महापूराच्या काळात आप्पाना इस्लामपूरमध्ये ठेवलं होतं पण सकाळपासून रात्रीपर्यंत ते अस्वस्थपणे मुलांना फोन करत होते.गावातील सगळी माणसं बाहेर पडली का?कोण राहील न्हाई ना?त्यांचा मुलगा मदत कार्यात होता पण आप्पाची घालमेल सुरू होती गावासाठी. वाघ आता थकला होता पण स्वस्थ नव्हता.सारखी काळजी करत होता.अखंड आयुष्य गावासाठी दिलेला हा माणूस. अजूनही त्याच घरात राहतोय. त्याची त्याला ना खंत ना खेद घरात येईल त्याला असेल ते खाऊ पिऊ घालणं. त्याचा पाहुणचार करणं ही रित. त्यानी त्यांचे नातू तेजस आणि श्रेयस यांनाही शिकवली आहे.तो वारसा ते चालवत आहेत. वयोमानानुसार आप्पांचे हात हलू लागले आहेत. पण रोज सकाळी आप्पा तशाच हाताने अंगण झाडतात,घरामागचा रस्ता स्वछ करतात.चार वाजता उठून आप्पांचा दिवस सुरू होत आता त्यांच्याकडं कामासाठी कोणी येत नाही पण आप्पा मात्र लोकांशी वाट बघत बसतात.लोक काम घेऊन येत नाहीत,त्यांना त्रास द्यावा असं लोकांना वाटत नाही.माणस येतात आप्पाना भेटायला. माणस आली की आप्पांचा गप्पा सुरु होतो मग अप्पा आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.गप्पा रंगतात.
सूर्य मावळत्या दिशेला निघाला होता. आम्ही आप्पांचा निरोप घेतला.'पुन्हा जेवायला येतो'असं त्यांनी वदवून घेतलं मगच जायची परवानगी दिली. काठी टेकत चालत आम्हाला सोडायला रस्त्यावर आले. अगदी आम्ही वळशापर्यंत जाईपर्यंत आमच्या दिशेने पहात उभे होते.आमची वाट बघत. गाव बदलतात.गावांचा विकास होतो पण त्यासाठी दत्तू रत्तु खोत आप्पा यांच्यासारखी लोक पायरीचे चिरे होतात म्हणूनच विकासाचा कळस दिसतो.या पायरीच्या चिऱ्याकड कोणाचं लक्ष नसत. त्यांना कसली प्रसिद्धी मिळत नसते किंवा त्याना  कुठला पुरस्कार मिळत नाही.आणि ही माणसंही अपार मेहनत करतात पण प्रसिद्धीपासून दूर राहतात म्हणूनच उपेक्षित राहतात. आप्पाना सलाम.त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
लेख :-
संपत लक्ष्मण मोरे
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com