लोकसहभागातून जलसंधारणाची कामे, आकोली झाली टंचाईमुक्त*
*लोकसहभागातून जलसंधारणाची कामे, आकोली झाली टंचाईमुक्त*
(महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाने घडविली आकोली गावात जलक्रांती)
जानेवारीपासूनच पाण्यासाठी अधिग्रहण केलेल्या बोअरवेलची मदत घेणाऱ्या उमरखेड तालुक्यातील आकोली गावात महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (एमव्हीएसटीएफ) च्यामाध्यामातून 2017 पासून लोकसहभागातून करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांमुळे परिस्थिती बदलली असून, हे गाव आता टंचाईमुक्त झाले आहे. 2017 ते 2020 या तीन वर्षात झालेल्या कामांमुळे पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे यावर्षी मे महिन्यातही गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत मुबलक पाणी असल्याने पाणी पुरवठा सुरळीत राहून बोअरवेल अधिग्रहणाची गरज पडली नाही.
काही वर्षांपूर्वी शिवारात पडणारे पावसाचे पाणी ओढ्या नाल्या द्वारे वाहून जात असे. जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आणि उपसा अधिक यामुळे गावात पाणीटंचाईच्या समस्येने अधिक उग्र रूप धारण केले होते, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत जलसंधारणाचा शाश्वत कृती आराखडा तयार करण्यात आला आणि ऍक्सिस बँक फाउंडेशन अर्थसहाय्याने व दिलासा संस्थेचे सुहास धस यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या चारशे हेक्टर शेतजमिनीवर बांध बंदिस्ती करून मृदा व जलसंधारण केले, तसेच दिलासा संस्थेने तीन किलोमीटर आणि मृदा व जलसंधारण उपविभाग उमरखेड यांच्यामार्फत जलयुक्त शिवार योजनेमधून एक किलोमीटर नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण करून सदर नाल्यांमध्ये रिचार्ज शाफ्ट करण्यात आले त्यामुळे गावातून वाहून जाणारे पाणी गावातच अडून राहिले आणि जमिनीमध्ये मुरले.
पावसाळ्यामध्ये बाळेराजा डोंगरावरून प्रचंड पाणी वाहत येऊन गावामध्ये पूर येऊन ते पाणी ओढ्या नाल्यात मिसळून वाहून जात असे, तलाठी गजानन सुरोशे यांच्या संकल्पनेतून सदर डोंगराच्या पायथ्याशी अनेक वर्षापासून पडीत ई-क्लास जागेवर तळे खोदण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेमधून एक गाव तलाव तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून मंजूर करून घेतला व दुसऱ्या गाव तलावासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातून निधी गोळा केला.
तलावाचे काम मोठे असल्याकारणाने हा लोकवर्गणीचा निधी अपुरा पडत असल्याने, दिलासा संस्थेचे अधिकारी सुहास धस यांच्याकडे तलावासाठी निधीची मागणी करण्यात आली व त्याप्रमाणे ऍक्सिस बँक फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब निनान यांच्याकडून दोन लाख रुपये निधी उपलब्ध झाला आणि गावामध्ये पन्नास मिटर लांब, पन्नास मिटर रुंद आणि तीन मिटर खोल आकारमानाचे दोन तलावांचे खोदकाम पूर्ण करण्यात आले, या कामांमुळे जवळपास एक कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. वर्गणी जमा करण्यासाठी गावातील तलाठी गजानन सुरोशे, सुदर्शन पवार, गंगाधर पवार, सुनिल पवार आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.
पाणीटंचाईच्या दाहकतेतून गावाला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांची मुहूर्तमेढ रोवली. यासाठी जलदुत प्रकाश वाघमारे, वनिता हनवते, रतनबाई वाघमारे, नंदा दवणे, अमोल जामकर, सुनील राठोड, दत्ता बोईनवाड, भारत बोईनवाड, परमात्मा कदम, यांनी पाणी प्रतिष्ठान कडून प्रशिक्षण घेऊन गावांमध्ये श्रमदानाच्या कामासाठी पुढाकार घेतला. सलग तीन वर्षे जल चळवळ राबविली. पाणी प्रतिष्ठानचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, चिंतामणी पवार, मधुकर लेंगरे यांच्या मदतीने तत्कालीन पंचायत समिती सभापती प्रवीण पाटील मिराशे यांनी गावामध्ये महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करून शेतामध्ये बांधबंदिस्ती करून मृदा व जलसंधारण यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. गावकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये श्रमदान करत मातीनालाबांध, दगडी बांध, वनराई बंधारे, बाळेराजा डोंगराच्या पायथ्याशी आणि शेतामध्ये पन्नास हेक्टरवर सीसीटी ही जलसंधारणाची कामे केली.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक शिवप्रसाद येळकर यांनी गावाच्या पाणलोटाचा अभ्यास केला व जलसंधारणाच्या कामांचा आराखडा बनवून, शासनाचे सर्व संबंधित विभाग, दिलासा-ऍक्सिस बँक फाऊंडेशन या सामाजिक संस्था व गावकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून विहीर पुनर्भरण, मागेल त्याला शेततळे, शोषखड्डे, रिचार्ज शाफ्ट, नालाखोलीकरण, गावतलावाचे काम सुरू होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून कामे मार्गी लावली.
या कामी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, मृदा व जलसंधारणचे प्रभाकर पारेकर, गायकवाड, तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे, कृषी पर्यवेक्षक रामकिसन शिंदे, सुरेश सूर्य, यांच्या सहकार्याने तलाठी गजानन सुरोशे, ग्रामसेवक लतीफ शेख, कृषी सहाय्यक पवन नरवाडे, अतुल मादावार, प्रदीप पवार, संतोष सरदार, सरपंच संगीताताई मिराशे, उपसरपंच बाबुराव वाघमारे, सदस्य सुभाष चीन्नावार, पोलीस पाटील पंडित धात्रक, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष नवलविजय पवार, सर्व जलदुत, ग्रामस्थांनी परिश्रम घेत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या माध्यमातून गावाला जल स्वयंपूर्ण केले.
