*रूग्णालयातील रिक्तपदांचा प्रश्न निकाली निघणार* *खासदार धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट* चंद्रपूर :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय समस्यांनी समस्यांनी ग्रस्त आहे. याची गंभीर दखल घेत, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्रालय गाठत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. मंत्री महोदयांनी सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. मागील अनेक महिन्यापासून कंत्राटी कामगाराच्या वेतनासाठी लागणार निधी तात्काळ शासनाकडून वितरित करण्यात यावे असे निदेश देखील त्यांनी दिले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास औषध पुरवठ्याचे काम राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीला दिले होते. ही कंपनीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीकडून मागणीनुसार औषधांचा पुरवठाच करण्यात येत नाही. अशीच परिस्थिती शस्त्रक्रिया साहित्याची आहे. गेल्या काही वर्षांत मागणी करूनही पाहिजे तसा औषधांचा साठा मिळत नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांत येणाऱ्या रुग्णांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वर्ग एकची दोन पदे, वर्ग दोनची सहा पदे मंजूर आहे. मात्र, ही पदे रिक्त आहेत. वर्ग तीनची तांत्रिक, अतांत्रिक अशी ५६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ शंभर पदे भरण्यात आली आहेत. तब्बल ४५३ पदे रिक्त आहे. ही पदे भरण्यात न आल्याने कार्यरत कर्मचाèयांवर कामाचा ताण पडत आहे. या समस्यांना घेऊन खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत रिक्त असलेली डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता हे पदे तातडीने भरण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांना श्री. देशमुख यांनी निर्देश दिले. यावेळी झालेल्या चर्चेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, यांची उपस्थिती होती.
